मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. या दलित हत्याकांडाची डीआयजी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पीडित कुटुंबातल्या एका सदस्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार असल्याचं सांगितलंय. तसंच पीडित कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन करण्याचं आश्वासनंही मुख्यमंत्र्यांनी दिले. पंकजा मुंडे आणि दिलीप कांबळे या दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ उद्या जवखेडा गावाला भेट देणार आहेत.
आरोपी मोकाट
पाथर्डी तालुक्यातल्या जवखेडा इथे दलित कुटुंबातल्या तिघांनी निघृण हत्या होऊन १२ दिवस होऊन गेले. पण अजूनही या हत्याकांडातल्या मारेक-यांना पकडण्यात आलेलं नाही. जाधव कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू आता सुकले. पण अजूनही आरोपी पकडलेले नाहीत.
अजित पवारांपासून अनेक नेते इथे भेट देऊन गेले खरे. पण आरोपी राजरोसपणे अजूनही फिरतायत. पोलिसांना दिसत नाहीयेत. तात्पुरत्या सांत्वना पलीकडे तपासात काहीच प्रगती झाली नसल्याची खंत जाधव कुटुंबीयांनी व्यक्त केली. घटनेचा तपास लवकर लागला नाही तर सरकारच्या दारात आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा कुटुंबीयांनी दिलाय.
भाजप-शिवसेनेवर तोफ
जवखेडातील पीडितांची भेट घेतली नाही म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप-शिवसेनेवर तोफ डागलीय. राज्यात दलितांवर अत्याचार होत असताना भाजप नेते शाही सोहळ्यात मश्गूल असल्याची टीका त्यांनी केलीय. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यामुळं राज्यपालांनी पीडित कुटुंबाची भेट घ्यालया हवी होती असंही त्यांनी नमूद केलंय.
राज ठाकरेंची आर्थिक मदत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अहमदनगरमधील जवखेडे येथील दलित हत्याकांडातील पीडितांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पीडित कुटुंबाला मनसेकडून एक लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली.
विविध भागांत आंदोलन
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्याच्या विविध भागांत जोरदार आंदोलनं करण्यात आली. लातूरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणा-या आंदोलकांनी रस्त्यावरील वाहनांवर, दुकानांवर आणि हॉटेल्सवर दगडफेक केली. यात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. ठाण्याच्या कोपरी भागात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलं. तर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर घाटकोपर इथं आंदोलन करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.