www.24taa.scom,
‘नवऱ्यांनो शौचालयं बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा’ असा इशारा दिलाय बुलढाण्यातल्या दिवठाना गावातल्या महिलांनी... महिलांनी ग्रामसभेत यासंदर्भातला ठराव पारीत केला. यामागणीचा विचार होईल आणि लवकरच हे गाव हगणदारीमुक्त होईल अशी आशा गावातल्या महिलांना आहे.
चिखली तालुक्यातल्या दिवठाना गावात आजही या गावातल्या महिलांना शौचालयास उघड्यावर जावं लागतं. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतोच पण गावात दुर्गंधी पसरून अनेकवेळा रोगराईलाही आमंत्रण मिळतं. म्हणून गावातल्या महिलांनी एक ऑक्टोबरला ग्रामसभा घेत गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी एक ठराव पारीत केला. गावातल्या प्रत्येक नव-यानं आपापल्या घरी शौचालय बांधलं नाही तर महिलांनी ‘चूल बंद आंदोलन’ करायचा निर्णय घेतलाय.
महिलांना होणाऱ्या असुविधेची जाणीव ठेवत काही सुज्ञ ग्रामस्थांनी २ महिन्यात संडास बांधून घेतो अशी ग्वाही दिली.तर ग्रामपंचायतही महिलांच्या पाठीशी असल्याचं सरपंचांनी सांगितलंय.
महिलांनी केलेल्या या मागणीमुळे गाव जर हगणदारीमुक्त झालं तर गावाला अनेक सरकारी योजनांचाही लाभ घेता येऊ शकेल आणि रोगराईही टाळता येईल.त्यामुळे आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी महिलांनी घेतलेल्या या पुढाकाराचं खरंच कौतुक व्हायला हवं.