www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होतंय. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.
या अधिवेशनात जादू-टोणा विरोधी विधेयक मांडलं जाणार आहे. यासाठी एकमत करण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. त्यासाठी आज राज्य सरकार विरोधकांशी चर्चा करणार आहे. या अधिवेशनातही आदर्श अहवाल मांडला जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होतंय. तर विरोधकांनी या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे.
पहिल्याच दिवशी सरकारला घेरण्यासाठी आज भारतीय जनता पक्षानं विदर्भ आणि मराठवाड्यात लक्षवेधी रास्ता रोकोची घोषणा केलीय. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको होणार आहे. कापूस, सोयाबीन आणि धानाला योग्य हमीभाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
यंदा विदर्भात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मात्र अजूनपर्यंत तरी शेतक-यांना हवी तशी मदत मिळालेली नाही. त्याविरोधात नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात हा रास्ता रोको करण्यात येणारेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.