नितीन गडकरींनी दिली आयकर विभागाला धमकी

भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजप नेते नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. पूर्ती ग्रूपवर छापा घालणा-या आयकर विभागालाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजप सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला कोण वाचवणार अशी खुली धमकीच त्यांनी आयकर विभागाला दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 24, 2013, 04:55 PM IST

www.24taas.com,नागपूर
भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजप नेते नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. पूर्ती ग्रूपवर छापा घालणा-या आयकर विभागालाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजप सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला कोण वाचवणार अशी खुली धमकीच त्यांनी आयकर विभागाला दिलीय.
अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण आता मोकळेच आहोत. त्यामुळं आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचं खुलं आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिलंय. आपण मर्द आहोत त्यामुळं शेवटपर्यंत संघर्ष करणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं.
पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच नागपूरात आलेल्या नितीन गडकरींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी महापौर, आमदारांसह ५००हून अधिक कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांना मार्गदर्शन करताना गडकरींनी आपल्याविरुद्ध आयकर खात्याचा वापर केल्याचा आरोप केला.
आजवर आपण पक्षाध्यक्ष असल्यानं जबाबदारी मोठी होती. मात्र आता या जबाबादारीतून मुक्त झाल्यामुळे आपल्यावर कोणतंही बंधन नाही. आता काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणणं हे आपलं पहिलं काम असल्याचं गडकरी म्हणाले.
२०१४ साली नागपूरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिलेत.काल सकाळी राजनाथ सिंग घरी आले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. कार्यकर्त्यांचं प्रेम हीच माझी पुंजी आहे, असं गडकरी म्हणाले.

काय म्हणालेत गडकरी
मी मर्द आहे, शेवटपर्यंत लढणार
आयटी अधिकाऱ्यांची नावे माहित आहेत
सोनिया गांधी, पी चिंदबरम् यांचीही चौकशी करणार
आयटी अधिकाऱ्यांना बघून घेईन
मला बदनाम करण्याचा डाव काँग्रेसने साधलाय
पृर्तीमध्ये कोणताही घोटाळा नाही
आमचं सरकार आले की काँग्रेसच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार
अध्यक्षपद नसल्याने मी मोकळा झालोय
सर्व रेकॉर्ड ठेवले आहे. काँग्रेसचा हिशोब चुकता करणार
काँग्रेसने सीबीआयसारखा आयटीचा वापर केलाय