पाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज

ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2012, 02:20 PM IST

रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानी कलाकारांबद्दल बोलताना राज यांनी सवाल केला, की पाकिस्तानी कलाकारांना गोंजारायची गरज काय?
आशाताईंबद्दल बोलताना राज यांनी सवाल केला, मी आशाताईंबद्दल काय चुकीचं बोललो? पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन कशासाठी द्यायचं? त्यांना उगीचच का गोंजारायचं? आशाताई म्हणतात, माझा राजकारणाशी काही संबंध नाही... पण, त्या भारतीय तर आहेत ना! एक भारतीय म्हणून त्यांनी हा कार्यक्रम सोडायला हवा. ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल. असं राज ठाकरेंनी `सूरक्षेत्र`वर आपलं स्पष्टीकरण दिलं.

आर आर पाटील, दिग्विजय सिंग यांची पुन्हा एकदा राज ठाकरेंनी खिल्ली उडवली. आर आर पाटील हे गृहमंत्री असूनसुद्धा त्यांना काहीच माहित नसतं, असं म्हणत राज यांनी गृहमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. तर दिग्विजय सिंग या `कार्ट्याने` त्यांना घालण्यासाठी आता कुठली शिवीच बाकी ठेवली नाही अशा शब्दांत दिग्विजय सिंग यांची संभावना केली. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांचे बहुतेक सर्व गुन्हेगार यूपी आणि बिहारचेच असतात. म्हणूनच गुन्हा करून ते बिहारला पळतात आणि तेथे आश्रय घेतात असं राज म्हणाले. याचबरोबर मी कायद्याला घाबरत असं ही राज म्हणाले..
हिंदी वृत्तवाहिन्यांचा समाचार घेताना राज म्हणाले की माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्याचा खेळ हिंदी वृत्तवाहिन्यांनी थांबवावा, अन्यथा मी त्यांचाच खेळ थांबवेन.