मुंबई : शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे.
उल्लेखनीय म्हणजे, हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलंय. त्यानंतर, शनी शिंगणापूरबाबतही राज्य सरकारची भूमिका कायम राहणार का? असा सवाल विचारला जातोय.
'फिजा' सिनेमातल्या एका गाण्यात एक मुस्लिम माता थेट हाजीअलीच्या कबरीजवळ जाऊन आपली मन्नत मागताना दिसली होती. पण जिथं हे शुटिंग झालं, त्याच हाजीअली दर्ग्यामध्ये महिलांना सध्या प्रवेशबंदी आहे. त्याविरोधात भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेनं बंडाचं निशाण फडकवलंय. महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. हाजीअली आणि मगदूब बाबा दर्ग्याचे ट्रस्टी एकच आहेत. मगदूब बाबा दर्ग्यात महिलांना प्रवेश आहे, मग हाजीअलीत का नाही? असा खडा सवाल याचिकाकर्त्या नूरजहाँ नियाज आणि झाकिया सोमन यांनी केलाय.
याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. तर याचिकेवरील सुनावणीच्यावेळी महाराष्ट्र सरकारनं महिलांची बाजू उचलून धरली. देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा असल्यानं महिलांना प्रवेश बंदी करणं योग्य नाही. राज्य सरकार त्याचं समर्थन करणार नाही. पण जर कुराण ए शरीफ आणि मुस्लिम धर्मात याबाबत काही तरतूद असेल तर तशी शहानिशा केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारनं कोर्टात मांडलीय.
उल्लेखनीय बाब म्हणजे, शनि शिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांच्या प्रवेशबंदीचा वादही सध्या गाजतोय. भूमाता ब्रिगेडनं या परंपरेविरोधात केलेल्या आंदोलनानंतर हा वाद सध्या महाराष्ट्र सरकारच्या कोर्टात प्रलंबित आहे. मग जी भूमिका हाजीअली दर्ग्यातल्या महिला प्रवेशाबाबत राज्य सरकारनं घेतली, तोच न्याय शनि शिंगणापूरबाबतही सरकार लावणार का?