मुंबईतल्या टॉवर्सवरही उभे राहणार हेलीपॅड?

मुंबईतल्या टोलजंग इमारतींवर हेलीपॅड बनवावं, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागलीय. काही हॉस्पिटल्स आणि कॉर्पोरेट जगातील मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या इमारतींवर हेलीपॅडच्या मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केलेत. 

Updated: Feb 9, 2016, 10:28 PM IST
मुंबईतल्या टॉवर्सवरही उभे राहणार हेलीपॅड? title=

मुंबई : मुंबईतल्या टोलजंग इमारतींवर हेलीपॅड बनवावं, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागलीय. काही हॉस्पिटल्स आणि कॉर्पोरेट जगातील मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या इमारतींवर हेलीपॅडच्या मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केलेत. 

जगातल्या अनेक प्रसिध्द इमारतींवर पंचतारांकीत सुविधांबरोबरच हेलिपॅडचीही सुविधा आहे. फक्त पाहुण्यांच्या सोयीसाठीचं नव्हे तर आपत्कालीन वेळेतही या हेलीपॅडचा उपयोग होतो. मुंबईतही उंच इमारतींवर हेलीपॅड बनवण्याच्या मंजुरीसाठी महापालिकेकडे अर्ज करण्यात आले आहेत. मोठ-मोठ्या कॉर्पोरेटसची ट्राफीकच्या समस्येतून मुक्तता होण्यासाठी याचा उपयोग होईलच शिवाय आग लागण्याच्या घटनांसारख्या इतर आपातकालीन घटनांमध्येही या हेलीपॅडचा उपयोग होऊ शकतो, असं एशियन हार्ट एन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष डॉ. रमाकांत पांडा यांनी म्हटलंय. 
 
यापूर्वीही मुंबई महापालिकेकडे हेलीपॅड बनवण्यासाठी विनंत अर्ज आले होते. मात्र बिल्डिंग स्ट्रक्चर आणि सुरक्षेच्या कारणास्तव यावर निर्णय झाला नव्हता. 

सध्या मुंबईमध्ये डोमेस्टीक एअरपोर्ट, जुहू एअरोड्रम आणि महालक्ष्मी रेसकोर्स इथे हेलीपॅडची सोय आहे, मात्र रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टर उतरवणे आणि उड्डाणासाठी इथं मनाई आहे. तसचं एअरपोर्ट आणि जुहू एअरोड्रम इथल्या हेलिपॅडचा वापर महागात पडतो. राजभवन आणि नौदलाच्या आयएनएस कुंजली इथल्या हेलीपॅडवर हेलीकॉप्टर उडवण्यास आणि उतरवण्यास शक्य आहे. मात्र, या हेलीपॅडचा उपयोग मर्यादीत स्वरूपातच होतो. 

अंधेरीमध्ये २०१४ साली २२ मजल्यांच्या लोटस बिजनेस पार्कमध्ये लागलेल्या गंभीर आगीनंतर कोस्टगार्डच्या हेलीकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. त्यावेळी उंच इमारतींवर हेलीपॅडची गरज लक्षात आली, मात्र त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंड्या बस्त्यात गेला.