...तर भाजपवर पहिला वार शिवसेनेचा असेल - उद्धव ठाकरे

माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला... यावेळी, भाषणात त्यांचा मुख्य रोख होता तो भाजपवर... 

Updated: Jan 23, 2015, 11:33 PM IST
...तर भाजपवर पहिला वार शिवसेनेचा असेल - उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंदमध्ये घेतलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाषणाच्या सुरूवातीलाच भाजपला टोला लगावलाय. 'भाजप सरकार जनतेवर अन्याय करतंय असं दिसलं तर पहिला वार शिवसेनेचा असेल' असा सज्जड दम भरायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. 

'शिवसैनिक कुणाच्या लाटेवर तरंगायला ओंडकं नाहीत. शिवसेना जी काही आहे ती स्वत:च्या जीवावर असल्याचा' खोचक टोला त्यांनी भाजपला लगावलाय. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कुणाचे उंबरठे झिजवणार नाही असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय. 

दरम्यान, या अगोदर शिवसैनिकांचं दैवत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  जयंतीच्या निमित्तानं शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर युवा पिढीला प्ररणा देणारी अखंड प्रेरणा ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. 

बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही प्रेरणा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. मुंबई महानगर पालिकेच्या पुढाकाराने आणि महानगर गॅस, भारत पेट्रोलियम यांच्या सहकार्याने ही ज्योत उभारण्यात आलीय. ही ज्योत अखंड तेवत राहणार असून  कार्यक्रमाला राज्यभरातील शिवसैनिकांबरोबरच सेनेचे तमाम नेते, आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते.

काय काय म्हटलं उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंदमध्ये...  
- भाजप सरकार जनतेवर अन्याय करतंय असं दिसलं तर पहिला वार शिवसेनेचा असेल... महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावं यासाठी पाठिंबा दिलाय... शेपूट घातलेलं नाही - उद्धव ठाकरे
- आम्ही कोणत्याही लाटेवर तरंगणारे लोंडके नाहीत... जे कुणी आहोत ते स्वत:च्या जीवावर आहोत - भाजपला टोला
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना न मागताच भारतरत्न मिळायला हवं - उद्धव ठाकरे
- मुंबई रक्त सांडून मिळवली आहे
- मजबूत सरकार आल्यानंतरही ३७० कलम का रद्द केलं जात नाहीय अजून? काश्मीरी पंडितांची घरवापसी केव्हा? उद्धव ठाकरेंचा सवाल... 
- संजय दत्तला मिळालेल्या फर्लोवर केली टीका
- 'फारच कमी वेळेत लढलास... बाळासाहेबांशिवाय लढलास... आणि तरीही सेनेच्या ६३ जागा निवडून आल्या' - मिळाली कौतुकाची थाप
- माझ्या छंदाचं मी स्वत:प्रदर्शन करतो... तुमचा 'छंद' प्रदर्शन करण्यासारखा असला तर दाखवा...  - उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला
- एक मुलगा असला तरी वाघासारखा असावा... मेंढ्यांसारखी पैदास हवीच कशाला 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.