www.24taas.com , झी मीडिया, मुंबई ,
शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंची अखेर उद्दव ठाकरेंनी भेट घेतलीय. उद्धव ठाकरेंनी शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी या तिघा नगरसेविकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. आणि विनोद घोसाळकरांवर लवकरात लवकर कारवाईचं आश्वासन दिलं.
याबाबत शीतल म्हात्रे यांनी घोसाळकर यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. आमचा उद्धव यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ते काय तो निर्णय घेतील असे झी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे घोसाळकर यांच्यावर शिवसेनेकडून कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली. मात्र, शिवसेनेकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती.
शीतल म्हात्रे यांनी विनोद घोसाळकरांविरोधात आपली मानसिक छळवणूक केल्याची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाला दखल घ्यावी लागली पण, शिवसेनेनं मात्र आपल्या पक्षातील ‘द्रौपदीं’साठी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे या ‘द्रौपदीं’च्या मदतीला शिवसेनेचा भाऊ ‘मनसे’ मैदानात उतरली. त्यामुळे शिवसेनेचे गोची झाली होती.
त्यानंतर घोसाळकर यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या शीतल म्हात्रे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यामुळे हे प्रकरण मिटेल असे वाटत असताना विरोधकांनी हा विषय उचलून धरला. घोसाळकर यांच्या विरोधात महिलांनी मोर्चाही काढला. परंतु सेना श्रेष्ठींनी घोसाळकर यांना पाठिशी घालणेच पसंत केले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.