www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याच्या निषेर्धात आज मुंबईत त्यांचा `महाराष्ट्राचा राजा` म्हणून प्रतिकात्मक राज्याभिषेक करण्यात आला.
सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी संपूर्ण महाराष्ट्राचा सातबारा उदयनराजेंच्या नावे करून निषेध करण्यात आलाय. आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी रयत संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदानात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नाट्य सादर करण्यात आले. या माध्यामातून साताऱ्यात उदयनराजे शेतकऱ्यांवर करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. शेतकऱ्यांनी या नाट्याला उत्स्फूर्त दाद दिली. शिवसेनेचे विधीमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, आमदार विनोद घोसाळकर आणि आमदार शरद पाटील उपस्थित होते.
आझाद मैदानात आपण सगळे साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. या प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळ्यामुळे सरकारला जाग येईल आणि सरकार याप्रकरणी कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास श्रमजीवी रयत संघटना आपला लढा यापुढे अधिक आक्रमक करून सरकारकडून न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा विवेक पंडित यांनी दिला.
उदयनराजे भोसले यांची लोकशाहीतली ही बेकायदेशीर राजेशाही अन्यायकारक आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशपरंपरेला साजेशी नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी शिकवण शिवरायांनी दिली होती, मात्र त्यांचे आताचे वंशज याच्या अगदी विरुद्ध कृती करत आहेत. आताचे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब अल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली.