विरार : प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली. या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
किंजल शहा सोमवारपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार होती. मंगळवारी राहत्या इमारतीच्या शेजारीच किंजलचा मृतदेह आढळला होता. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तिची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय होता.
पोलीस तपासात किंजलची हत्या प्रियकर देवेंद्र दिनकर भोसले यानेच केल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी देवेंद्रला अटक केली आहे. देवेंद्र आणि किंजल यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. किंजलला एका दुसऱ्या तरुणाबरोबर फिरताना पाहिल्यानं देवेंद्रचा राग अनावर झाला. हत्येच्या दिवशी देवेंद्र किंजलला घेऊन तुंगारेश्वर येथे गेला होता. त्यानंतर त्याने तिला तिथल्या पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि तिला रिक्षात बसवून तिचा मृतदेह सोसायटीजवळ फेकून दिला, अशी पोलिसांची माहिती आहे.