www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर संडेलाही कायम आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलंय.
नवी मुंबईत रात्रभर पावसाचा जोर आहे. तर मुंबईत सकाळी पावसाचा जोर दिसून आला. हिंदमाता येथे पाणी साचलंय. मात्र असं असलं तरी या पावसाचा रेल्वे आणि ट्रॅफिकवर परिणाम झालेला दिसून आलेला नाही. त्यातच मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांना १०.३० नंतर प्रवासात अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमार्गावरून हार्बरच्या गाड्या धावणार आहेत. तर पनवेल ते अंधेरी रेल्वे बंद राहणार आहे.
वीकेंडला राज्यभर वरुणराजाचं दमदार कमबॅक झाल्याचं दिसून आलं. मुंबईसह कोकण, विदर्भ, खान्देशात पावसाची जोरदार हजेरी लागली. संततधार पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहेत. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ दिसून येत आहे.
राज्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वादळी वा-यामुळे मोठे नुकसान झालंय. संततधारमुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावरची वाहतूक रस्त्यावर झाडे पडल्याने विस्कळीत झाली होती. सार्वजनिक बांधकामाच्या कामगारांनी झाडे बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरु केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पावसानं दोन जणांचा बळी घेतला. गणेशपूर गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने ३० वर्षीय परशुराम लथाळे हे वाहून गेले आहे. तर दुस-या घटनेत जळगाव जामोद शहराजवळ एक झाड पडून पिंपळगावचे महावितरणाचे कनिष्ट अभियंता प्रल्हाद कतोरे यांचा जागीच मृत्यू झाला.
रायगड जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झालीये. बळीराजा सुखावला असून पेरण्यांच्या कामांना आता वेग आलाय.
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय. खेडमध्ये नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. यामुळे खेड-सुसेरी रस्ता पाण्याखाली गेलाय. तर दापोली-बोंडिवली रस्ताही पाण्याखाली गेलाय. नातुनगर परिसरातील ६५ घरांवर दरड कोसळण्याचा धोका असल्याने इथल्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
माशांचा प्रजनन काळ सुरू असल्याने राज्यशासनाने दोन महिने समुद्रातील मासेमारीवर बदी घातलीये. त्यामुळे उरण मधल्या मोरा आणि करंजा बंदरात शेकडो बोटी किना-यालगत नांगरण्यात आल्याचं चित्र पहायला मिळतंय.
खान्देशात पावसाची संततधार सुरु आहे.. जळगावसह अमळनेर, धरणगाव, चोपडा, पारोळा तालुक्यात मान्सूनचा पाऊस बरसतोय... आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं कमबॅक केल्यानं बळीराजा सुखावलाय.. पावसामुळं नदीनाले जलमय झाले असून भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.