www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर `चालला मोहन कुणीकडे?` अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं आता मोहन रावले मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं मोहन रावले हा विषय संपलेला आहे... उद्धव यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मोहन रावले यांना शिवसेनेतून डच्चू देण्यात आला... लागोपाठ पाचवेळा खासदार असलेल्या रावलेंना २००९साली देखील शिवसेनेनं दक्षिण मुंबईतून तिकीट दिलं होतं. परंतु त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. आता आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना तिकीट देण्यात येणार आहे. आपला पत्ता कापला जाणार, याची जाणीव असल्यानंच रावले यांनी शिवसेनेतील कार्यपद्धतीवर सोमवारी जहरी टीका केली... आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली.
आता मोहन रावले लवकरच मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय... दोन आठवड्यापूर्वी रावलेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. दक्षिण मुंबईतून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यास आमदार बाळा नांदगावकर इच्छुक नाहीत. त्यामुळं या मतदारसंघात मनसेकडे चांगला उमेदवारच नाही. तर माजी खासदार असलेल्या रावलेंकडे मतदारसंघ नाही. त्यामुळं ते मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवतील, असा अंदाज आहे.
राज ठाकरे आणि रावलेंचे संबंध चांगले आहेत. शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद आधी रावलेच सांभाळत होते. त्यानंतर ती सूत्रे राज ठाकरेंकडे गेली. त्यामुळं दोघांमध्ये चांगला सलोखा होता. बाळासाहेबांचे बॉडीगार्ड म्हणून कित्येक वर्षे मातोश्रीवर राहिल्यानं तेव्हापासूनच त्यांची राजबरोबर नाळ जुळली होती. त्यातच विद्यमान आमदार बाळा नांदगावकर यांना पर्याय म्हणूनही रावलेंसारख्या अनुभवी नेत्याला राज ठाकरे मनसेत स्थान देऊ शकतात, असं बोललं जातंय...
परंतु रावले मनसेमध्ये गेले तरी त्यांच्यामागं लागलेलं मिलिंद नावाचं शुक्लकाष्ठ दूर होणार नाहीय... शिवसेनेत मिलिंद नार्वेकरांचा जांच होता... तर लोकसभा निवडणुकीत त्यांचा सामना पुन्हा एकदा काँग्रेसच्या मिलिंद देवराशी होणार आहे... त्यामुळं `मागे उभा मिलिंद, पुढं उभा मिलिंद...’अशीच रावलेंची बिकट अवस्था झालीय....
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.