मुंबई : मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या मागणीवरून नवा वाद पेटलाय. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय. तर शिवसेनेनंच याबाबत आता मवाळ भूमिका घेतलीय.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून ही भूमिका मांडली आणि देशभरात खळबळ उडाली. सरकारनं मुस्लिमांसाठीचं पाच टक्के आरक्षण आधीच रद्द केलंय. त्यात राऊतांच्या भूमिकेमुळं आगीत तेल ओतलं गेलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं मुस्लिम हक्क आरक्षण परिषद घेऊन, सरकारलाच आव्हान दिलंय.
भाजपचे वादग्रस्त खासदार साक्षी महाराज यांनीही राऊतांचीच री ओढलीय. तर मतदानाचा अधिकार काढून घेणारा मायेचा पूत जन्मलेला नाही, असा टोला एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसींनी लगावला.
दरम्यान, हा वाद पेटल्यानंतर आता मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याची कोणतीही मागणी केली नसल्याचा खुलासा शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय.
राज्यात औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरूय. तिथं मुस्लिम कार्ड महत्त्वाचं ठरणार असल्यानं, प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.