शाब्बास शोभा आण्टी,शिवसेनेची 'सामना'तून टीका

मल्टिप्लेक्समध्ये पाईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांना हुकूमशहा म्हणणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून सडकून टीका केलीय. 

Updated: Apr 9, 2015, 01:00 PM IST
शाब्बास शोभा आण्टी,शिवसेनेची 'सामना'तून टीका title=

मुंबई: मल्टिप्लेक्समध्ये पाईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांना हुकूमशहा म्हणणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून सडकून टीका केलीय. 

शोभा डे यांनी जी मुक्ताफळे उधळलीत तो मराठीचा अपमान आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. राज्य मराठी असलं तरी राज्यकर्त्यांनी मराठी भाषा, कला, संस्कृती यासाठी काही करू नये अशी काही उपटसुंभांची अपेक्षा असते. पुन्हा तसं केलं तर त्यास दादागिरी म्हटलं जातं. मराठीच्या मुळावर मराठी दांडेच गोतास काळ बनून आले तर काय करायचे? असा प्रश्न लेखात विचारण्यात आला आहे. 

'काय हे शोभा आण्टी' या मथळ्याखाली सामनातून शोभा डे यांचा समाचार घेण्यात आला असून  महाराष्ट्रात जन्मास येऊन मराठीचे पांग आपण चांगलेच फेडत आहात, अशा उपरोधिक शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तसंच मराठी असूनही मराठी चित्रपट आणि लोकप्रिय मराठी खाद्यपदार्थांची टिंगल उडवल्याबद्दलही त्यांना सुनावण्यात आलंय. 

मल्टिप्लेक्स सिनेमागृहांत मराठी चित्रपटांना प्राईम टाइम देण्याच्या मुद्द्याबाबत पेज थ्री’वाल्या एक सुसाट मराठी महिला शोभा डे पचकल्या आहेत. मराठी सिनेमांना प्राईम टाईम देणं त्यांना आवडलं नाही आणि त्यांनी सरकारी निर्णयावर टीका केली आहे. प्राईम टाइमला मराठी सक्ती ही दादागिरी आहे आणि आता चित्रपटगृहांमध्ये पॉपकॉर्नऐवजी वडापाव आणि मिसळ खावी लागेल! अशी मुक्ताफळं या बाईंनी उधळली आहेत. इतर कोणी ही ट्विटरवरची टिवटिव केली असती तर एकवेळ समजण्यासारखं होतं. पण शोभा आण्टी या मराठी बाईनं ही टिवटिव केली हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं लेखात म्हटलं आहे. 

दादागिरीचा विषय ‘आण्टी’नं काढला म्हणून सांगायचं असं की इतिहास काळात शिवाजी महाराज आणि आताच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादागिरी केली नसती तर शोभा आण्टीच्या आधीच्या आणि आताच्या पिढ्या पाकिस्तानात जन्मास आल्या असत्या आणि बहुधा त्यांना ‘पेज थ्री’च्या पार्ट्या बुरख्यातच साजर्‍या कराव्या लागल्या असत्या.

मराठीविषयी पोटशूळ उठणाऱ्यांना मराठी ठसका आणि दणका द्यावाच लागेल. मराठीचं खायचं आणि  गरज सरताच द्वेषाच्या पिचकार्‍या मारायच्या. शोभा आण्टीनं जी मुक्ताफळे उधळलीत तो मराठीचा अपमान आहे, असं लेखात म्हटलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.