मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ५ डिसेंबरला सरकारचा विस्तार होईल. नव्याने एकूण २२ जणांना मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यात भाजपचे १० आणि शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान शिवसेनेनं तुलनेने कमी महत्वाच्या खात्यांवर समाधान मानल्याचं दिसत आहे. भाजपने दिलेला प्रस्ताव मान्य असल्याची माहिती आहे.
भाजपने नाही नाही म्हणत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह गृहखाते, सिंचन अशा महत्त्वाच्या खात्यांची मागणी शिवसेनेने केली होती. तसंच केंद्रातही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद वाढवून देण्याची सेनेची मागणी आहे. मात्र राज्यात १२ मंत्रिपदं देऊऩ भाजपनं सेनेला खूश करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाल्याचं दिसत आहे.
शिवसेना आता भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होणार अशीच आता चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिवसेनेला अखेर १२ मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पाच कॅबिनेट आणि सात राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे.
शिवसेनेला उद्योग, पर्यावरण, आरोग्य, रस्ते विकास, परिवहन किंवा उत्पादन शुल्क ही मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर रामदास कदम, निलम गोऱ्हे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.