मुंबई: मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर असताना शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत अजून संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू असल्याची वक्तव्यही केली जातायत. शिवसेना अथवा भाजपा या दोन्ही पक्षांकडून सत्तेतील सहभागाविषयी कुठलीही स्पष्ट भूमिका जाहीर केली जात नसल्यानं याबाबतचा गोंधळ आणखीनच वाढताना दिसतोय.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपा शिवसेनेला बरोबर घेईल अशी शक्यता दिसत होती. त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांमध्ये चर्चाही सुरू झाली. अगदी सरकारचा ३१ ऑक्टोबरला झालेल्या शपथविधीच्या दिवशी सकाळपर्यंत याबाबत हालचाली सुरू होत्या. मात्र शिवसेनेचा प्रस्ताव न पटल्यानं भाजपानं शिवसेनेला सत्तेत बरोबर घेण्याबाबतचा प्रस्ताव बाजूला ठेवला. शिवसेनेनंही आक्रमक भूमिका घेऊन शपथविधीवर बहिष्कार टाकला. मात्र भाजपा नेत्यांचा फोन जाताच शिवसेनेनं भूमिका बदलली आणि ते शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले.
दुसरीकडे विश्वासदर्शक ठराव, अध्यक्षपदाची निवडणूक यावेळीही शिवसेनेनं आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलं. शिवसेना आता विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारविरोधात शिवसेना आक्रमकही झाली आहे. असं असलं तरी अजूनही सत्तेत सहभागी होण्याचे शिवसेनेचे मार्ग बंद झालेले नाहीत. काही शिवसेना नेत्यांकडून आणि भाजपा नेत्यांकडून येणारी वक्तव्य लक्षात घेतली तर दोन्ही पक्षात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं दिसतं.
सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही पक्षात सत्तेत सहभागी होण्याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. शिवसेनेनं १० मंत्र्यांचा प्रस्ताव भाजपाला दिला आहे. मात्र भाजपाककडून या प्रस्तावावर अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेमध्ये यामुळं अस्वस्थता वाढत आहे. शिवसेना-भाजपाच्या या भूमिकेमुळं लोकांमध्येही प्रचंड संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाचे नेतेही करताना दिसत नाहीत.
आम्ही एकत्र येणार नाही अथवा आम्ही एकत्र येणार अशी ठोस भूमिका ना भाजपा मांडत आहे, ना शिवसेना मांडत आहे. त्यामुळं आता मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत काय होईल त्याबाबत प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. हा गोंधळ बहुधा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच संपेल असं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.