कन्हैयावरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा एकदा 'सामना'

मुंबई : कन्हैया कुमार प्रकरणावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आलेत.

Updated: Mar 7, 2016, 03:49 PM IST
कन्हैयावरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा एकदा 'सामना' title=

मुंबई : कन्हैया कुमार प्रकरणावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आलेत. कन्हैयाला 'फुकटात प्रसिद्धी' मिळवून दिल्याचा आरोप शिवसेनेने भाजपवर केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून हा आरोप करण्यात आलाय. 

"कन्हैया कुमार याला फुकटची प्रसिद्धी मिळत आहे असा टोला व्यंकय्या नायडू यांनी मारला. कन्हैया यास फुकटची प्रसिद्धी मिळते असे नायडू यांचे म्हणणे असेल तर त्यास कोण जबाबदार आहे? सध्या आपल्या देशात काहीच फुकट मिळत नाही व लहानसहान गोष्टींचीही जबर किंमत मोजावी लागते. मजूर वर्ग, कामगार वर्गाच्या कष्टाच्या ‘प्रॉव्हिडंट फंड’च्या पैशांवरही सरकारने आता कर लावला. म्हणजे थोडक्यात देशासाठी राबणार्‍या श्रमिकांच्या घामावरही कर लावून ‘फुकट काही नाही’ हेच सरकारने दाखवून दिले." असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आलाय. 

'गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारा हार्दिक पटेल किंवा कर्नल पुरोहित तसेच साध्वी प्रज्ञा यांच्यासारख्यांना जामीन मिळत नसताना कन्हैयाला जामीन कसा मिळतो? त्याला जास्त वेळ आत ठेवणे सरकारला जड गेले असते व अनेक प्रश्नांना उत्तर द्यायला लागले असते हे खरे मानावे काय?' असा सवालही शिवसेनेनं केला. 'निवडणुकीआधी दाखवलेली स्वप्ने हवेत विरून जातात व शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी त्याच वैफल्यग्रस्ततेचे शिकार होतात.' अशा शब्दांत शिवसेनेने भाजप सरकारला लक्ष्य केले.