मुंबई: फिल्मी स्टाइल पाठलाग करून तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेनं खोल समुद्रात रशियाच्या मालवाहू जहाजाला परत मुंबई बंदराकडे फिरण्यास भाग पाडलं. हे सगळं थरार नाट्य घडलं १७ तारखेला सकाळी मुंबई बंदरापासून सुमारे १५० किमी अंतरावर खोल समुद्रात घडलं.
MV SEVASTOPOL (सेवास्टोपोल) या रशियाच्या मालवाहू जहाजाचं चेन्नईच्या M/S NTC Logistics (P) या कंपनीबरोबर काही व्यावसायिक वाद झाले होते. तेव्हा M/S NTC Logistics या कंपनीने मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. १३ फेब्रुवारीला न्यायालयानं MV SEVASTOPOLच्या विरोधात निकाल देताना अटक वारंट बजावलं. MV SEVASTOPOL या जहाजाविरोधात वारंट बजावल्याची माहिती तटरक्षक दलाला १५ तारखेला देण्यात आली. हे मालवाहू जहाज मुंबई बंदरापासून ३० किमी अंतरावर समुद्रात नांगर टाकून असल्याचं आढळून आलं.
या वारंटबद्दल तटरक्षक दलानं जहाज कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि जागा न सोडण्याचा इशारा दिला. मात्र १७ तारखेला रात्री एक वाजता या जहाजानं मुंबईपासून दूर जाण्यास सुरुवात केली. जहाजाची ओळख पटवता येणारी Automatic Identification System यंत्रणा या जहाजानं बंद केली. त्यामुळं तटरक्षक दलानं गस्ती नौका आणि शोध विमानांच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवली. अखेर पळ काढणाऱ्या जहाजाला तटरक्षक दलाच्या CGS अग्रीम गस्ती नौकेनं गाठत परत मुंबईकडे फिरण्यास भाग पाडलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.