www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत देशातील पहिली आणि जगातील दुसरी लांब अंतराची मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ धावली. मात्र, याआधी पहिली मोनोरेल कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहित आहे का? दोन शतकांपूर्वी रशियात जगातील पहिली मोनोरेल धावली.
जगातील पहिली मोनोरेल १८२० मध्ये रशियामध्ये सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई सुरू करण्यात आलेली मोनोरेल ही दुसऱ्या क्रमांकाची लांबीची रेल आहे. यामुळे मुंबईचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत प्रवास दिवसागणिक कठिण होत चालला आहे. त्यामुळे मोनोरेलमुळे प्रवास आता काहीप्रमाणात सुकर होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी मुंबई मोनोरेलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर लवकरच मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई मोनोरेलची एकूण लांबी १९.१७ किलोमीटर आहे. दोन टप्प्यात ही रेल्वेसेवा होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. चेंबूर ते वडाळा दरम्यान १७ स्टेशन आहेत. येथील तिकिट दर ५ रूपये ते १९ रूपयांदरम्यान आहे.
जगातील पहिल्या क्रमांकाच्या लांबीची मोनोरेल कॉरीडोर जपानमध्ये आहे. ओसाका मोनोरेल कॉरीडोरची लांबी २३.८ किलोमीटर आहे. या कॉरीडोरदरम्यान १९ स्टेशन आहेत.
मुंबईत सुरू करण्यात आलेल्या मोनोरेलची विशेष रंगीत आणि अंतर्गत रचना गुजरातमधील अहमदाबाद येथील राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेने केली आहे. ही रचना सांस्कृतिक विविधता आणि मुंबईचा निसर्गाप्रती असलेला दृष्टिकोन या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. ही रचना करताना मुंबईतील लोकल, दिल्लीतील मेट्रो आणि मलेशियातील मोनोरेलचा अभ्यास केल्यानंतर तयार करण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.