दोघांचे भांडण... `आरपीआय`ला लाभ?

माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 16, 2014, 05:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.
`माढाच्या जागेवर आरपीआयचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे जानकर-शेट्टींनी या जागेसाठी वाद घालण्यापेक्षा आरपीआयलाच ही जागा सोडण्यात यावी` अशी मागणी महायुतीतील एक पक्ष `रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया`चे नेते रामदास आठवले यांनी केलीय.
 
महादेव जानकर यांनी माढाच्या जागेचा आग्रह धरलाय. मात्र, महायुतीच्या जागावाटपात माढाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या निर्णय झालाय आणि या निर्णयावर महायुती ठाम असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात आज बीडमध्ये महायुतीची एक बैठकही आयोजित केली गेलीय. या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत माढाच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माढ्याच्या जागेवरून बेबनाव झाल्याचं निमित्त करून काँग्रेसनं महायुतीवर टीका करण्याची संधी साधलीये. मुळाच भिन्न विचारांचे पक्ष महायुतीत एकत्र आल्यामुळे त्यांच्यात वाद होणार हे स्पष्ट असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी म्हटलंय.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.