www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत. राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित आहेत. महिनाभरात राज ठाकरे तिस-यांदा बाळासाहेबांच्या भेटीला गेलेत. दोघांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊतही मातोश्रीवर येऊन गेलेत.
दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी मातोश्रीवर गेले होते. यावेळी सुमारे दीड तास भेट घेतली. राज ठाकरे आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
दसऱ्या मेळाव्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी मी थकलो आहे. तुम्ही एकदा येऊन पाहा, तुमच्या शिवसेनाप्रमुखाची काय हालत झाली आहे, असे भावनिक भाषण बाळासाहेबांनी केले. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती खराब असल्याचे जाणवत होते. त्यामुळेच बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांनी कौटुंबिक भेट घेतली होती.
यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. या अगोदर जवळपास दोन महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरे हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्या गाडीचे सारथी बनून मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं होतं. आता सध्या बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असताना राज ठाकरेंनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा ‘मातोश्री’मध्ये पाऊल टाकलं.
‘ज्या माणसानं मला अंगाखांद्यावर खेळलो... ज्यांनी वाढवलं... ज्यांनी संस्कार केले... कसं वाटणार त्यांना भेटून...? नक्कीच खूप आनंद झाला होता.’अशी भावना बाळासाहेबांच्या मागच्या भेटीत राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. यावेळी बाळासाहेबांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणतात, याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलंय. ही भेट नेमकी कशासाठी होती, या भेटीच्या वेळी काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही. मात्र, काका-पुतण्यांमधला विसंवाद संपल्याचीच ही चिन्हं आहेत.