मुंबई : संपूर्ण राज्यभरात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जातेय. पण पावसानं मुंबईकरांना सरप्राईझ दिलं. सलग दुस-या दिवशी पहाटेपासून रिमझिम पाऊस आहे. मुंबईकर पावसासाठी सज्ज होता तशी तयारी पालिका प्रशासनानं केलेली दिसली नाही. याचा परिणाम म्हणून मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचलं. तर नालेसफाईच्या फोल दाव्यांमुळे रस्त्यांवरही पाणी साचलं, आणि स्वाभाविकच वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबईत आजही अशाच पद्धतीनं पाऊस राहिल असा अंदाज वेध शाळेनं वर्तवलाय.
जुलै महिन्यात दाखल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईत दैना उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आज दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत चांगलाच गारवा पसरलाय. या पावसाचा मेट्रो रेल्वेला दणका बसला. तर दुसरीकडे आजपासून मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आलेय. हा पाऊस दोन दिवस सुरुच राहण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.
पहिल्याच पावसात मुंबई आणि ठाणे येथे ठिकठिकाणी पाणी साचले. नालेसफाई केल्याचा दावा मुंबई पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, तो साफ खोटा होता हे पहिल्याच पावसाने दाखवून दिले. मिठी, दहिसर, पोयसर नद्या आणि नाल्यांचे प्रवाह कचऱ्याने रोखल्याने अनेक भाग जलमय झाले. तसेच काही वस्त्या आणि विभाग पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेने केलेल्या रस्त्यालगतच्या गटारांची सफाईही उघडी पडली.
भायखळा, बधवार पार्क, मुंबई सेंट्रल, दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, धारावी, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, विद्याविहार, मुलुंड, भांडुप, सांताक्रूझ, मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, दहिसर, मिलन सब वे या ठिकाणी पाणी साचले होते.
मध्य आणि हार्बर रेल्वे यांची पुरती वाताहत झाली. कोलमडलेल्या रेल्वेसेवेमुळे मुंबईकरांना रेल्वेतून पायउतार होऊन रुळांवरून पायपीट करावी लागली. कुर्ला, विद्याविहार, भांडुप येथे पाणी साचले होते. या पावसामुळे दिवसभरात मध्य आणि हार्बर या दोन्ही मार्गावरील १५०हून अधिक सेवा रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली. तर मुंबई आणि परिसरात ३३ वृक्ष पावसामुळे उन्मळून पडले.
आज गुरुवारपासून २० टक्के पाणीकपात मुंबईत लागू झाली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाच्या आगमनाने आल्हाददायक झालेल्या वातावरणात दुपारी महापालिकेच्या स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संमतीने पाणीकपातीचा निर्णय घेतला गेला. पाणीकपातीचा सर्वाधिक फटका टेकडीवर आणि पाणीवितरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रहिवाशांना पाणीपुरवठय़ाबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहेत. मुंबई शहर - २३६७ ८१०९, मुंबई पूर्व उपनगर - २५१५ ३२५८, पश्चिम उपनगर - २६१८ ४१७३ या क्रमांकावर तक्रारी स्वीकारल्या जातील, असे सांगण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.