www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पावसाळा आला, आरोग्य जपा...ही आरोग्य विभागाची जनजागृती नेहमीचच...पण आता पावसाळा आला, मानसिक आरोग्यही जपा...अशी नव्या जनजागृतीची वेळ आलीय.
आकाशातून बरसणा-या सरी.... थंडगार वारा ....नभांनी दाटलेलं आकाश...यामुळे वातावरण कसं आल्हाददायी बनलंय...निसर्गानं जणू हिरवा शालू…
याच्या उलट वातावरण मुंबईसारख्या शहरात दिसून येते. सखल भागात तुंबणारे पाणी, रेल्वेचा उडालेला बोजवारा, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि कोसळणा-या जुन्या इमारती...पावसाळ्यातील या समस्या तर आहेतच शिवाय जोडीला येणारे विविध आजारही...हे कमी होते म्हणून की काय आता मानसिक आजारांचीही यात भर पडलीय. प्रामुख्याने पश्चिमेकडील देशांमध्ये हिवाळ्यात दिसून येणारे सिझनल अफेक्टीव डीप्रेशन आता पावसाळ्यात मुंबईकरांमध्ये दिसू लागलंय. या दिवसांमध्ये सूर्यप्रकाश नसल्याने शरीरातील डी जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. तसंच सततचा पाऊस, ढगाळ वातावरणाचा शरीर आणि मनावर परिणाम होतो. पावसाळ्यात घराबाहेर पडण्याची इच्छा होत नाही, काम करण्यात उत्साह वाटत नाही, ऑफिसला जाण्यात निरुत्साह वाटतो, कार्यक्षमता कमी होते, अंथरुणावर पडून राहावे असे वाटते. तसंच चिडचिडेपणा, मूड ऑफ होणे, सारखे रडू येणे, कमीपणा वाटणे, गरज नसताना खात राहणे, भूक न लागणे. ही लक्षणे पावसाळ्यात अधिक दिसून येताना दिसतात.
26 जुलैच्या घटनेला सात वर्षे उलटून गेली असली तरी मुंबईकरांच्या मनामध्ये त्या घटनेच्या कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत. जोरदार पाऊस कोसळू लागल्यास अनेक मुंबईकरांना अतिकाळजी वाटून मनावर ताण येतो.
मानसिक आजारांवर सुरुवातीलाच योग्य उपचार झाल्यास ते बरे होऊ शकतात. तसंच नेहमी सकारात्मक विचार केल्यास असे आजार जवळही फिरकणार नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.