शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून आता राजकारण सुरू

निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकरी संकटात सापडला असताना, मायबाप सरकार आहे तरी कुठं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दुसरीकडं शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून राजकारण सुरू झालंय.

Updated: Mar 2, 2015, 09:21 PM IST
शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून आता राजकारण सुरू  title=

मुंबई: निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकरी संकटात सापडला असताना, मायबाप सरकार आहे तरी कुठं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दुसरीकडं शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून राजकारण सुरू झालंय.

राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय... आणि राज्याचे कृषिमंत्री मात्र केवळ पंचनामे करु अशी पोकळ आश्वासनं देऊन वेळ मारुन नेतायेत. खडसे साहेब, तुमची ओळख राज्याला नाथाभाऊ अशी आहे... सध्याच्या मंत्रिमंडळात शेतीची जाण असणारे प्रभावी नेते तुम्हीच आहात आणि तुमच्याच राज्यात हे काय चाललंय? महाराष्ट्राला गारपिटीचा फटका बसून आता सहा महिने उलटून गेलेत... कदाचित तुमच्या हे विस्मरणात गेलं असावं. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पॅकेजची आणि मदतीची घोषणा तुम्ही केलीत खरी. मात्र आता या घोषणेलाही ७० दिवस उलटून गेलेत. हो तब्बल ७०हून अधिक दिवस. मात्र शेतकऱ्यांच्या पदरात अजून काहीच पडलेलं नाही. आता या अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार? यावरून विरोधकांनी आता सरकारला चांगलचं धारेवर धरलंय.

अवकाळी पावसाचा तडाखा अजून संपलेला नाही. मात्र दोन दिवसानंतरही नुसती आश्वासनं देण्यातच फडणवीस सरकार दंग आहे. 

विदर्भ, मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा फेरा सुरु आहे. गारपिटीच्या फटक्यानंतर विदर्भ, मराठवाड्यात एकट्या जानेवारी महिन्यात १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या चार वर्षांत राज्यात ५,६९८ एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यायेत. 

पाणी नाही, शेती नाही, घरात अन्न नाही.. अशा स्थितीत कर्ज काढून शेतकरी पीक जगवण्याचा प्रयत्न करतोय. त्यात निसर्गाची अशी अवकृपा झाली, तर जगायचं कसं, असा प्रश्न त्याच्यासमोर, आणि त्याच्या कुटुंबीयांसमोर आहे.. खडसे साहेब, केंद्र सरकारची मदत येईल तेव्हा येईल, राज्य सरकार मदतीचा हात पुढं करणार की नाही? याआधी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार? आणि आता या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचं काय? याची उत्तरं मायबाप सरकारला द्यावीच लागतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.