मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता आणि तो कायम राहणार, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.
जैतापूर प्रकल्प स्थानिकांना नको असल्याचे सांगत याच मुद्यावर शिवसेनेने निवडणुका जिंकल्या असल्याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये करार केल्याचे वृत्त असून आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भारत आणि फ्रान्समध्ये अणूऊर्जा प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात दोन्ही देशांत हा करार झाला असून एकूण २ अब्ज युरोची गुंतवणूक फ्रान्स भारतात करणार आहे.
या अणुऊर्जा करारामुळे जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना नाराज झाली आहे. या अणुऊर्जा करारामुळे राज्यातल्या जैतापूर प्रकल्पालाही आता चालना मिळणार आहे. जैतापूरमध्ये ६ प्लांट तयार करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पासाठी अरेवा आणि एलएनटी कंपनीशी करार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्षं लागलेलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.