www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.
कामकाज तहकूब झाल्यानंतरही त्यांनी समांतर विधानसभा सुरू ठेवून सरकारविरोधात दंड थोपटलेत. तर विधान परिषदेतही ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. पण सिंचनाच्या मुद्यावर उद्या सकाळी १० ते १२ या वेळेत चर्चा करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केल्यानं, हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
विदर्भातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओला दुष्काळ जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भातल्या अमरावती, वाशीम, चंद्रपूर, नागपूरला भेट दिली आणि पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
विदर्भात पुरामुळं यंदा मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय. त्यापार्श्वभूमीवर आज विदर्भाचं सरकारच्या घोषणेकडे लक्ष होतं. मात्र यावर कोणतीच घोषणा न झाल्यामुळे विदर्भातले आमदार नाराज झालेत. त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.