मुंबई : लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांवर काय करता येईल, याची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या वेळेत सीएसटीकडे येणार्या लांब पल्ल्याच्या (एक्स्प्रेस) ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.
डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसटीकडे येणार्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेने हा नवा प्रस्ताव तयार केलाय. प्रथम तीन एक्सप्रेस गाड्यांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आलेय.
लोकल प्रवास करताना सकाळच्या वेळेत कल्याणपासून सीएसटीला येण्यासाठी प्रवाशांना प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागते. यात कल्याण ते ठाणे दरम्यान प्रवाशांना तर गर्दीमुळे लोकलमध्ये चढणेही मुश्कील होते. त्यामुळे अनेक प्रवासी दोन ते तीन लोकल सोडल्यानंतर एखादी कमी गर्दी असणारी लोकल पकडतात. या प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने हा प्रस्ताव तयार केला आहे.
प्रथम महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसटीला येणारी लातूर एक्स्प्रेस व सिकंदराबाद ते सीएसटी देवगिरी एक्स्प्रेसची निवड मध्य रेल्वेकडून केल्याचे अधिकार्याने सांगितले. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवासास मुभा देण्यात येणार असल्याने आणि स्वतंत्रपणे तिकीट आकारणी केली जाणार असल्याने, त्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीचीही आवश्यकता आहे. हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.