मुंबई : देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून येतंय.
सुरूवातीला प्रचंड डोकेदुखी, घसादुखी, घशात खवखवणे, आवाज बसणे यांसारख्या प्रकार वाढत आहेत. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना खोकल्याचा जोर वाढत जातो.
ही पथ्ये पाळा
थंड पाणी, बर्फाचे पदार्थ, आईस्क्रीम खाऊ नका जागरण टाळा
खोकला थांबत नसल्यास स्वतःच कोणतीही औषधे घेऊ नका
गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना तोंडावर मास्क बांधा
खोकल्याच्या प्रकाराचे निदान करण्यासाठी थुंकीची तपासणी करा
सकाळी उठल्यावर गुळण्या करा आणि गरम पाणी प्या
का वाढतोय खोकला?
उष्मा जाऊन हवेत गारवा आल्याने निर्माण झालेला कमी दाब खोकल्याचे जंतू पसरवण्यासाठी पोषक ठरतो. संसर्गित व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी गेल्यास याची लागण इतरांना होते आणि हा खोकला फैलावत जातो.
ऱ्हायनोव्हायरल संसर्ग झाल्याने खोकला वाढलेल्या पेशंटचे प्रमाणही वाढत आहे. या संसर्गामध्ये नाक चोंदणे, सर्दीसह खोकताना नाकातून पाणी गळणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. यात खोकला तीव्र असला तरीही ताप मात्र सौम्य प्रकारचा असतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याची जास्त लागण होते.
ज्यासोबत कफ पडत नाही असा कोरडा खोकलाही वाढत आहे. वातावरणातील धुळीचे अतिरिक्त प्रमाण, प्रदूषण, जंतुसंसर्गामुळे हा खोकला बळावतो. कोरडा खोकला झाल्यानंतर घसा दुखतो, खोकून छातीतील बरगड्याही दुखू लागतात. लहान मुलांमध्ये टॅान्सिलच्या ग्रंथीवर सूज आल्यानंतर असा खोकला येतो. आठ ते १० दिवसांत तो बरा न झाल्यास थुंकीची तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे.
तर जिवावर बेतू शकते
कोरडा खोकल्यावेळी छातीच्या पिंजऱ्यातील व पोटाच्या स्नायूंचे जोरात आकुंचन होते. हा पडदा छातीच्या बाजूला जोरात ढकलला जातो. फुफ्फुसातील दाब खूप वाढून स्वरयंत्रणेच्या पट्ट्या दूर ढकलल्या जातात. त्यामुळे आतील हवा बाहेर फेकली जाते. या प्रक्रियेत फुफ्फुसातील छोट्या पिशव्या फुटू शकतात, छोट्या श्वासनलिका बंद होतात. त्यामुळे फुफ्फुसातील हवा बाहेर असलेल्या स्तरांमध्ये जाते, त्यातून श्वास बंद होऊन जीवावर बेतू शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.