www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरे यांच्या आंदोलनावर जीतेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते जीतेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांचं टोलविरोधी आंदोलन फसलं असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे, यावर बोलतांना जीतेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर ही टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी आज सकाळी टोलविरोधी आंदोलन सुरू केलं, राज ठाकरे यांना यापूर्वीच पोलिसांनी नोटीस बजावली होती.
राज ठाकरे आज सकाळी वाशी टोल नाक्याकडे निघाले असतांना, त्यांना चेंबूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं.
मात्र काही वेळांनी राज ठाकरेंची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी फोनवरून संवाद साधला आहे.
टोलच्या मुद्यावर बोलण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी नऊ वाजता सह्याद्रीवर चर्चेसाठी बोलावणं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
पण यापूर्वीही राज ठाकरे यांना चर्चेचा पर्याय मुख्यमंत्र्यांनी दिला होता, मात्र राज ठाकरे यांनी ही चर्चा मीडियासमोर व्हावी अशी मागणी केली होती.
उघडचर्चेला मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे उद्या सह्याद्रीवर बोलावणं आल्यानंतर चर्चेला जाणार आहेत.
आता ही चर्चा मीडियासमोर होणार आहे की, राज आणि सीएम यांच्यात हे अजुनही गुलदस्त्यात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.