महाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन

मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 15, 2014, 09:17 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.
साठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ याचं निधन झालंय. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ढसाळ यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळाचे अचूक भान असलेले मराठीतील दोन बंडखोर हुंकार. त्यापैकी एक आहे कवयित्री व प्रा. प्रज्ञा दया पवार. दुसरे आहेत महाकवी. ते म्हणजे नामदेव ढसाळ. अशी त्यांची ओळख होती.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यात झाला. मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.
दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहे. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गोलपीठा भागात अत्यंत गरीबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.
१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक) आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.
त्यांचे कविता संग्रह
-गोलपीठा (१९७२)
-खेळ (१९८३)
-मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
-तुही यत्ता कंची (१९८१)
-या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
-मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
-तुझे बोट धरुन चाललो आहे
-आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
-गांडू बगीचा (१९८६)
नाटक
-अंधार यात्रा
कादंबरी
-हाडकी हाडवळा
निगेटिव स्पेस्
पुस्तके
-आंधळे शतक - मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
पुरस्कार
-बुद्ध रोहिदास विचार गौरव - २००९
-साहित्य जीवन गौरव पुरस्कार २००४
-पद्मश्री पुरस्कार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.