'काळ्या जादू'नं घेतला माकडांचा जीव?

बोरिवलीच्या नॅशनल पार्कात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचे मृत्यू वाढलेत. काय आहेत त्यामागची कारणं? पाहा झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव्ह इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट...

Updated: Apr 3, 2015, 01:40 PM IST
'काळ्या जादू'नं घेतला माकडांचा जीव? title=

मुंबई : बोरिवलीच्या नॅशनल पार्कात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचे मृत्यू वाढलेत. काय आहेत त्यामागची कारणं? पाहा झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव्ह इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट...

काही महिन्यांपूर्वी बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये नऊ माकडांचा गूढ मृत्यू झाला होता. या माकडांना विष देऊन ठार मारण्यात आलं, असं नॅशनल पार्क प्रशासनाच्या अहवालात निष्पन्न झालं. मात्र, या माकडांना विष का देण्यात आलं, याचं उत्तर अजून सापडलेलं नाही.

हे प्रश्न उपस्थित झालेत कारण अलिकडेच नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करणारांना काही संशयास्पद बाबी आढळल्यात. त्या ठिकाणी एखाद्या तंत्रविद्येचा किंवा काळ्या जादूचा प्रयोग होत असावा, अशी शंका त्यामुळं निर्माण झालीय. अबीर-गुलालाने माखलेली ३०-४० कापलेली लिंबं तिथं आढळून आलीत. 

ही संशयास्पद लिंब आणि माकडांचा मृत्यू यात काही कनेक्शन आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र माकडांच्या मृत्यूनंतर याच जंगलात आणखी काही प्राण्यांची हत्या झाल्याचंही उघड झालंय. त्यामुळं 'झी मीडिया'नंही आपली समांतर शोध मोहीम सुरू केली. नॅशनल पार्कच्या आत पाच किलोमीटर घनदाट जंगलात आमची इन्वेस्टिगेशन टीम पोहोचली. 
 
आम्हाला तिथं आढळलं ते शिकाऱ्यांचं अस्तित्व... हे शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करत असावेत, असे पुरावे तिथं आढळले. दोन फांद्यांना टांगलेली ही तार पाहा... ती एवढी पातळ आहे की माणसांनाही ती दिसणार नाही. छोटे वन्यप्राणी या तारेच्या सापळ्यात अडकतात आणि शिकार बनतात. तिथून आम्ही आणखी पुढं निघालो. अचानक एका ठिकाणी राख, ड्रम आणि काही लाकडं दिसली. जंगलाच्या या भागातही मानवांचं अस्तित्त्व असल्याच्याच या खाणाखुणा. खरं तर ही आहे दारूची भट्टी... भट्टी गरम होती आणि त्यामधून गरमागरम धूर निघत होता. माकडांच्या मृत्यूमागं या बेकायदा भट्ट्याही असू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. कारण माकडं या लोकांना चावायची, आरडाओरडा करायची, त्यांच्या दारू बनवण्याच्या कामात विघ्न यायचं. त्यामुळंच दारू उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या गुळात जहरी विष मिसळून ते माकडांना खायला खालायचे. मग काही अंतरावर जाऊन त्या माकडांचा मृत्यू व्हायचा. घनघोर जंगलातल्या या मानवी घुसखोरीची माहिती आम्ही नॅशनल पार्कचे मुख्य वन संरक्षक विकास गुप्ता यांना दिली, तेव्हा संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

नॅशनल पार्कमध्ये असे बेकायदे धंदे सुरू असताना, त्याची माहिती प्रशासनाला नसावी, याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. वन अधिकाऱ्यांचं अभय असल्याशिवाय अशा बेकायदा दारूभट्ट्या जंगलात सुरू राहतील? वन अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीशिवाय हे शक्य आहे? वन विभाग आता आपली कारवाई बेकायदा अड्ड्यांपुरती मर्यादित ठेवणार? की निष्पाप वन्य जीवांच्या मृत्यूला जबाबदार वन खात्याच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.