मुंबई : मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आता कांजूरमार्गचा विचार करण्यात आलाय. आरे कॉलनीतील कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विरोध केला होता.
मेट्रो-३ च्या आरे कॉलनीतील प्रस्तावित कार डेपोच्या उभारणीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाय. या अहवालात मेट्रोच्या कार डेपोसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय देण्यात आला आहे.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत मुंबई मेट्रो लाईन-३ मधील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठीच्या प्रस्तावित कार डेपोमुळे होणारी संभाव्य वृक्षतोड रोखण्यासाठी या डेपोची जागा बदलावी, अशी मागणी विविध संस्था आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे यासंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती.
या समितीत एमएमआरडीएचे आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर डॉ. श्याम आसोलेकर आणि दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनचे संचालक एस. डी. शर्मा यांचा समावेश होता.
राज्य सरकारने तीन महिन्यांच्या कालावधीत कांजूरमार्ग येथील जमीन या प्रकल्पाला दिल्यास एमएमआरसीला पुढील काम सुरू करणे शक्य होईल. एमएमएल-३ या भूमिगत कॉरिडॉरच्या कार्यान्वयन क्षमतेसाठी आरे कॉलनीच्या जागेवर आवश्यक असणाऱ्या केवळ १६ स्टॅबलिंग लाईन्स बांधण्यात याव्यात. मात्र, असे करताना आर्थिक भार फार वाढणार नाही आणि ५०० पेक्षा कमीच वृक्षांवर परिणाम होईल, याबाबत एमएमआरसीने दक्षता घ्यावी, असेही समितीने सूचविलेय.
कांजूरमार्गचा पर्याय नसल्यास डीएमआरसीने सुचविल्याप्रमाणे आरे कॉलनी येथे सुधारित आराखड्यासह डबल डेक डेपो उभारण्यात यावा. मात्र, अशा स्थितीत या प्रकल्पाच्या खर्चात सुमारे ७५० कोटी रूपयांनी वाढ होईल, असेही या समितीने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.