www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई पुन्हा एकदा सॉफ्ट टार्गेट ठरतंय. यासाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या विमानतळ मार्गाचा वापर केला जातो. मुंबईत विमानतळ मार्गे रोज जवळपास कोट्यावधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी तपास यंत्रणा डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. पण, तस्करांच्या छुप्या तस्करीच्या प्रकारांमुळे सुरक्षा यंत्रणांच्या या पहाऱ्याचा फायदा होत नाही.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांमुळे मुंबईसह जगभरातल्या असंख्य विमानतळ सुरक्षा यंत्रणांची झोप उडालीय. कारण, तस्करांनी तस्करीच्या ज्या नवनवीन ट्रिक्स शोधून काढल्या आहेत, त्यामुळे विमानतळ मार्गे रोज कोट्यावधी रुपयांची तस्करी केली जातेय.
कशी होते ही तस्करी...
- शरीराच्या अवयवात कोकेनचे कैपसूल्स लपवणे
- टोपीच्या आत कोकेन सारख्या अंमली पदार्थांची तस्करी
- इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून केली जाते अंमली पदार्थांची तस्करी
- लहान मुलांच्या खेळण्यात आणले जातात अंमली पदार्थ
- गिटार मधून केली जाते Methaqualone ड्रग्सची तस्करी
- कलिगंडामधून केली जाते केटामाईन ड्रग्सची तस्करी
- बूटाच्या आतून केली जाते एमपेटामाईन ड्रग्सची तस्करी
- अंतवस्त्रात केली जाते `एमडीएमए` ड्रग्सची तस्करी
भारतात आणि विशेषतः मुंबईत अंमली पदार्थांची मागणी लक्षात घेता, माणसांचा जीव कवडीमोल ठरु लागलाय. कारण, या तस्करीत अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला ९० टक्के धोका असतो. नुकतचं टांझानियाच्या नागरिकानं पोटात कोकेनने भरलेले शंभर कॅप्सूल लपवून आणले होते. यांची बाजार भावानुसार पाच कोटी किंमत होती. तो सुरक्षा यंत्रणांचं सुरक्षा कवच भेदून बाहेर पडला. पण, त्या शंभर कॅप्सुल्सपैकी एक कॅप्सुल पोटात फुटल्यानं त्याचा जीव गेला आणि तेव्हा ही तस्करी उघड झाली, अशी माहिती कस्टमचे अॅडिशनल कमिशनर मिलिंद लांजेवार यांनी दिलीय.
गेल्या वर्षभरात विमानतळ मार्गे झालेली अंमली पदार्थांची तस्करी ही गेल्या दहा वर्षातली सर्वात जास्त आहे. २०१२ या वर्षी ३५ कोटी ६४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी तस्करांकडून जप्त केलेत. तर २०१३ या वर्षात ८५ कोटी १३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ म्हणजे २०१२ या वर्षांच्या तुलनेत थेट दुप्पट अंमली पदार्थ तस्करांकडून जप्त करण्यात आलेत.
या अंमली पदार्थांची तस्करी मंबईत दिवसेंदिवस वाढत चाललीये. ही तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांवर अंकुश लावणं गरजेचं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी इतर देशांच्या तुलनेत कमकुवत असलेले कायदे कठोर केले तर अंमली पदार्थांची मागणी होणार नाही आणि परिणामी अंमल पदार्थांची तस्करीही होणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.