मुंबई : सर्वच राजकीय पक्षांकडून विरोध होत असलेला मुंबईचा विकास आराखडा अखेर रद्द झालाय. राज्य मंत्रीमंडळानं या विकास आराखड्यात दुरुस्त्या करण्याचे आदेश पालिकेला दिलेत. आता नवा आराखडा तरी वस्तुस्थितीचं भान राखून बनवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
मुंबईच्या विकास आराखड्याचं शेवटी हसचं झालं. हा आराखडा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या विकास आराखड्यात अनेक त्रुटी होत्या. मुंबईच्या भौगोलिक वस्तुस्थितीचा अंदाज न घेता केवळ एसी कॅबिनमध्ये बसून हा आराखडा बनवण्यात आला होता.
अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढवण्याऐवजी कमी करण्यात आली होती. काही ठिकाणी पार्किंगची जागा वाढवण्याऐवजी कमी करण्यात आली होती. काही ठिकाणी इमारतींच्या जागी तलाव दाखवण्यात आला होता. हेरिटेजच्या मुद्द्याचा विचारच करण्यात आला नव्हता.
क्लस्टर डेव्हलपमेंटचा कुठलंही नियोजन या आराखड्यात नव्हतं. टीओडी झोनमध्ये ६ ते ८ एफएसआय देऊन पार्किंगचं नियोजनच करण्यात आलं नव्हतं. मुंबईची ओळख असणारे कोळीवाडे, गावठाणं यांचा विचार न करता तिथं रस्त्यांचं नियोजन करण्यात आलं होतं.
त्यामुळं बाहेरच्या कंपनीला काम देऊन मुंबईकरांचे साडेबारा कोटी रुपये पालिकेनं का वाया घालवले, असा प्रश्न आता विचारला जातोय. आयुक्त मात्र सध्या यावर बोलायला तयार नाहीत. यापूर्वी १९९१ मध्ये पालिकेच्या ८० अभियंत्यांनी बनवलेला विकास आराखडा यापेक्षा कितीतरी नियोजनबद्ध होता, हे आता मुंबईकरांच्या लक्षात येऊ लागलंय. आता तरी मुंबईकरांचा विचार करणारा विकास आराखडा पालिका तयार करेल, ही अपेक्षा नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
आता श्रेयवादाची लढाई सुरू
विकास आराखडा रद्द झाल्यावर आता श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. आदित्य ठाकरेंनी काय ट्वीट केलंय. विकासाला मारक असा विकास आराखडा होता. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. चुकीचा विकास आराखडा रद्द केल्याने हे अभिनंदन आहे.
मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर आता शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. विकास आराखडा रद्द करण्याची सर्वात आधी शिवसेनेनं मागणी केल्याचा दावा खासदार राहुल शेलार यांनी केलाय. तर मुंबईकरांचा हा आवाज आपण सर्वप्रथम विधानसभेत मांडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असा दावा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय.
मुंबईचा विकास आराखडा रद्द झाला ही अतिषय योग्य गोष्ट झाली, आता नवा विकास आराखडा लोकाभिमुख असावा, अशी अपेक्षा नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.