मुंबई : २६/११ हल्ला प्रकरणी आरोपी डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीत आणखी एक मोठा खुलासा केलाय. मुंबई विमानतळ आमच्या टार्गेटवर होते. मात्र, यश मिळाले नाही.
दरम्यान, मुंबईतील नौदलाचा तळ आणि सिद्धीविनायक मंदिराभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असल्याने या दोन्ही ठिकाणांवर हल्ला करू नका अशी सूचवा मी 'लष्कर'ला केली होती, असे हेडलीने साक्षीदरम्यान सांगितले.
मुंबईवरील हा हल्ला म्हणजे भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्व बॉम्बस्फोटांचे सडेतोड उत्तर असेल, हाच आपला बदला असेल असे लख्वीने मला सांगितले होते, असे हेडलीने म्हटलेय.
दुसरीकडे मी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन परिसराचे व्हिडिओ शूटिंग केले. मुंबईवरील हल्लेखोरांना त्यांची ओळख लपवता यावी आणि ते भारतीयांसारखेच वाटावेत यासाठी मी १५-२० पवित्र गंडे खरेदी केले. पाकिस्तानात गेल्यावर मी ते गंडे साजिद मीरला दिले, त्याला ही कल्पना खूप आवडल्याचे हेडलीने सांगितले.
मेजर इक्बालने मला मुंबईतील नौदलाच्या तळाची नीट पाहणी करण्याची सूचना केली होती. मी रेकी करून लष्करच्या माणसांशी त्याबद्दल चर्चाही केली होती. ज्यू नागरिकांचे कम्युनिटी सेंटर असलेल्या छाबडा हाऊसला (नरिमन हाऊस) जुलै २००८ मध्ये मी भेट दिली आणि तिथलेही व्हिडीओ शूटिंग केले. साजिद मीर आणि अब्दुर रेहमान पाशानेच मला तशा सचूना दिल्या होत्या, असे हेडलीने सांगितले.
तसेच अत्यंत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी मी भविष्यात भाभा अणु संशोधन केंद्रातून (बीएआरसी) ISI साठी माणसं नेमावीत अशी सूचनना मला मेजर इक्बालने केली होती. मी बीएआरसीला भेट देऊन त्याचा व्हिडीओही बनवला, जो मी साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांच्या हवाली केला. १ ते ३० जून २००८ पर्यंत मी पाकिस्तानात होतो, तेव्हा मी साजिद मीर, अबू खफा, अब्दुर रेहमान पाशा, लख्वी आणि मेजर इक्बाल यांना भेटून मुंबईवर हल्ला चढवण्यासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांची माहिती दिली, असे हेडलीने आज सांगितले.