मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... तोही हाऊसफुल्ल

मुंबईकरांच्या सेवेत नव्याने रूजू झालेली मोनो रेल पाहण्यासाठी आज पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली... भारतातील पहिल्याच मोनो रेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनो रेलचे व्यवस्थापन पुरते कोलमडले आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. मात्र, मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... हाऊसफुल्ल झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2014, 10:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांच्या सेवेत नव्याने रूजू झालेली मोनो रेल पाहण्यासाठी आज पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली... भारतातील पहिल्याच मोनो रेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनो रेलचे व्यवस्थापन पुरते कोलमडले आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. मात्र, मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... हाऊसफुल्ल झाला.
फर्स्ट डे, फर्स्ट शो... आणि तोही हाऊसफुल्ल... तिकिटासाठी लोक रांगेत तिष्ठत उभे होते... तिची एक झलक पाहायला मिळावी, एवढीच त्यांची इच्छा होती... जे नशीबवान होते, त्यांना तिकिटं मिळाली आणि जे कमनशिबी होते, त्यांना स्टेशनवरूनच माघारी परतावं लागलं... हे चित्र होतं मोनो रेल स्टेशनांचं.
भारतातील पहिलीच मोनो रेल मुंबईत चेंबूर ते वडाळ्यादरम्यान धावू लागलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी मोनोरेलचे उद्घाटन झाले आणि ही मोनोराणी मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाली. या मोनोराणीची सफर अनुभवण्यासाठी रविवारी सकाळपासून हौशे, नवशे आणि गवशे मुंबईकर रांगा लावून उभे होते.
तिकिटांसाठी एवढी प्रचंड गर्दी उसळली की, गर्दीचं नियोजन करतांना मोनो रेल प्रशासनंही गोंधळून गेले. ही गर्दी बघितल्यावर आपण नेहमीचीच लोकल तर पकडत नाही ना, असाच भास मुंबईकरांना होत होता. सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईकरांनी आपल्या कुटुंबकबिल्यासह मोनोची सफर अनुभवण्यासाठी हजेरी लावली होती.
रुळांऐवजी सिमेंट क्राँक्रिटच्या भिंतीवरून धावणारी ही मोनोराणी मायानगरी मुंबईचं आणखी एक आकर्षण बनलीय... नवा टुरिस्ट स्पॉट बनलीय... तंत्रज्ञानाची ही लेटेस्ट कमाल पाहण्यासाठी आणखी काही दिवस अशीच झुंबड उडणार आहे. मोनोचा फर्स्ट शो पुढचे काही दिवस तुफानी गर्दी खेचणार आहे.
मुंबईकरांच्या उत्स्फूर्त गर्दीमुळं पहिल्याच दिवशी मोनोला लेटमार्क लागला... सकाळी सात वाजता चेंबूरहून सुटणारी पहिली मोनो काहीशी उशीरानेच सुटली. जसा जसा दिवस सरकू लागला तसतशी स्टेशनांमधील गर्दी वाढत गेली. मोनोरेलची वेळ सध्या सकाळी ७ ते दुपारी ३ एवढीच ठेवण्यात आलीय. मात्र मुंबईकरांची गर्दी पाहता दुपारी २ वाजताच मोनो रेल प्रशासनाला तिकीट विक्री बंद करणे भाग पडले. त्यामुळं ज्यांना तिकिट मिळाली, त्यांच्यासाठी ३ वाजल्यानंतरही मोनो धावली. पहिल्याच दिवशी जवळपास २० हजाराहून अधिक लोकांनी मोनोची राइड एन्जॉय केली. परंतु रांगेत उभ्या असलेल्या अन्य प्रवाशांचा मात्र हिरमोड झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ