www.24taas.com, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई
भाजपच्या महागर्जना रॅलीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळं शिवसेनेत अस्वस्थता आहे. शिवसेनेनं भाजपच्या तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करावं असा मागणी वजा आग्रह पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे धरलाय...शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हे शक्तिप्रदर्शन करण्याचा शिवसेना नेत्यांचा इरादा आहे.
जे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलं, नेमकं तेच एनडीएच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारानं मात्र टाळलं...गुजरात जातीय दंगली प्रकरणी राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेल्या मोदींच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले होते. त्यामुळे महागर्जना रॅलीत मोदींनी बाळासाहेबांबाबत कृतज्ञता व्यक्त करावी अशी अपेक्षा होती. पण या रॅलीत मोदींनी बाळासाहेबांचा उल्लेख केला नाहीच, पण उद्धव ठाकरे यांचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. त्यातच रॅलीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे या नाराजीला अस्वस्थतेची जोड मिळालीय...आता शिवसेनेनं भाजपला आपली ताकद दाखवून द्यावी, असा सूर शनिवारी शिवसेनाभवनात झालेल्या बैठकीत नेत्यांनी आळवला...23 जानेवारी या शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेनं सुरु केलीय...भाजपच्या महागर्जनेला शिवसेना `महानिर्धारा`नं उत्तर देईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय...एमएमआरडीए मैदान किंवा गोरेगावच्या एनएसएसी ग्राऊंडवर हा महानिर्धार करण्यात येण्याची शक्यता आहे...
राज्यात भाजपची वाढती ताकद मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी चिंतेचा विषय झालीय...लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा दोन्ही पक्षातल्या मैत्रीमध्ये थेट परिणाम होणार नाही, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं सत्तेच्या प्रमुख पदावर दावा ठोकल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते...त्यामुळे काळाची दिशा ओळखून शिवसेनेनं पावलं उचलायला सुरुवात केलीय...
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 22 -26 चा फॉर्म्युला नक्की झालाय. देशामध्ये युतीत भाजप हा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात मात्र शिवसेना मोठा भाऊ, असं जागा वाटपाचं सूत्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना १७१ आणि भाजप ११७ हा फॉम्युला आहे. सध्याच्या घडीला राज्यात भाजपचे 8 खासदार तर ४७ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ११ खासदार आणि ४५ आमदार आहेत.
पण राज्यात वरचढ कोण या मुद्यावर शिवसेना भाजपमधला स्पर्धासंघर्ष लपून राहिलेला नाही. अलीकडेच ठाण्यातला राडा हे त्याचं ताजं उदाहरण आहे.... मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडण्याच्या आत्मघातकी निर्णयापर्यंत हा संघर्ष जाणार नाही, याची दोन्ही पक्षाकडून पुरेपूर काळजी घेतली जातेय
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.