www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दसरा मेळाव्यातील अपमान नाट्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं नॉट रिचेबल आहेत. कुठे गेलेत याचा पत्ता नाही. नाराज जोशी पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. ते सेनेला जय महाराष्ट्र करणार का, चाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठे गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही. सोमवारी सकाळी ते दादरच्या ओशियाना निवासस्थानातून पत्नीसह बाहेर निघाले.
आपल्या गावी नांदवीला जोशी सर जात असल्याची माहिती जोशींच्या निकटवर्तियांनी दिली. परंतु ते गावी गेलेले नसल्याने ते नेमके कुठं आहेत, याचा पत्ता कार्यकर्त्यांनाही नव्हता. त्यामुळं मनोहर जोशी गेले कुणीकडे, अशी चर्चा रंगली होती.
मनोहर जोशी शिवसेना सोडणार का, शिवसेना सोडली तर ते कोणत्या पक्षात जातील आणि त्यांची पुढची राजकीय कारकिर्द कशी असेल, याबाबत नानाविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर केलेली टीका मनोहर जोशींच्या चांगलीच अंगलट आली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी हुर्यो उडवली तसेच जोशींना लाखोली वाहली गेली. त्यामुळे अपमानित होऊन जोशींना घरी परतावे लागले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.