मुंबई : मुंबईच्या मलबार हिलमधील एका प्रस्तावित रस्त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. या रस्त्यामुळं व्हीआयपी लोकांची सोय होणार असली तरी तिथल्या हिरव्यागर्द झाडीवर कु-हाड चालवली जाणाराय. शिवसेना या रस्त्याला विरोध करत असून भाजप रस्ता बनविण्यासाठी सर्व ताकद लावत आहे.
झाडे लावा, झाडे जगवा...आणि जगलेली झाडे मग मुंबई महापालिका विकासाच्या नावाखाली तोडून टाकणार. मलबार हिलमध्ये आता हेच होणाराय. हँगिग गार्डनला लागून असलेली ही हिरवीगर्द झाडं आणि निसर्गरम्य परिसर काही दिवसांत दिसणार नाही. कारण मलबार हिलवरून थेट गिरगाव चौपाटीवर जाणा-या ट्रॅफीकविरहीत शॉर्टकटसाठी इथल्या निसर्गावर कु-हाड चालणार आहे.
हँगिंग गार्डन ते तांबडी चौक या ५३५ मीटर्सच्या रस्त्यासाठी ७२ झाडांपैकी ४८ झाडं तोडली जातील. तर उर्वरीत २४ झाडांचं पुनर्रोपण केलं जाईल. तसंच प्रसिद्ध हँगिंग गार्डन म्हणजेच कमला नेहरु पार्कचा २,५४० चौरस मीटरचा भागही या रस्त्यात जाणार आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने होत असलेल्या या रस्त्याला शिवसेनेने आणि स्थानिकांनी विरोध केलाय.
मलबार हिलसारख्या उच्चभ्रू आणि व्हिआयपी मार्गावरील वाहतूक कोंडीची तत्परतेनं दखल घेतलेल्या महापालिकेनं मुंबईतल्या इतर ठिकाणच्या वाहतूक कोंडीकडेही तितक्याच तातडीने पाहण्याची गरज आहे. या रस्त्यावरून मित्रपक्ष आमनेसामने आले असले तरी सेनेच्या सहमतीशिवाय भाजपला हा रस्ता पूर्णत्वास नेणं बरंच जिकीरीचे जाणाराय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.