मुंबई : मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?
मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचं सावट
२६ नोव्हेंबर २००८ ते २८ नोव्हेंबर २००८ या दिवसांतले ५९ तास मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. मुंबईत घुसलेल्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अक्षरशः थैमान घातलं. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं. १६० पेक्षा जास्त जणांनी प्राण गमावले. २०० पेक्षा जास्त जखमी झाले. या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस दलाला आधुनिकीकरणाचे वेध लागले. त्यानुसार मुंबईत कुठे हल्ला होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन दरवर्षी सर्व पोलीस ठाणे सुरक्षेचा आढावा घेतात. या सर्वेक्षणातून मुंबई अजूनही ६० टक्के असुरक्षित असल्याचं दिसून आलंय.
मॉल, पंचतारांकीत हॉटेल्स अजूनही असुरक्षितच
पोलिसांनी धार्मिक स्थळे, न्यायालये, पंचतारांकीत हॉटेल्स, मॉल, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मोठ्या बाजारपेठा, मोठी सार्वजनिक मंडळं, चौपाट्या, परदेशी दूतावास अशा ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेतला. यात अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत कमी उंचीची आढळली. स्कॅनर बंद पडल्याचं आढळलं, सुरक्षा रक्षक सतर्क नसल्याचं आढळलं. २५७ ठिकाणी सरप्राईज व्हीजीटमध्ये ११८ ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ढिसाळ होती. मुंबईतल्या ६४० पैकी ४०० पेक्षा जास्त ठिकाणी दहशतवादी सहज कारवाई करू शकतात असं आढळलं
याला आळा बसावा म्हणून पोलिसांनी शाळा, कॉलेज, मॉलसारख्या ठिकाणी संभाषणं आयोजिक केली. गेल्यावर्षी २७ सुरक्षा अभियानं आयोजिक केली होती, त्याऐवजी यावर्षी १०५ जागरूकता अभियानं आयोजिक केली. सुरक्षेत हयगय असलेल्या ठिकाणी नोटीसा बजावून कारवाया झाल्या. मुंबई पोलीस मुंबई सुरक्षित राहावी म्हणून प्रयत्न करत आहेतच. पण आपणही सुरक्षेशी तडजोड न करता सतर्क राहण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.