www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२०१४ लोकसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच्या सगळ्या ४८ जागांवरच्या इच्छुकांची नावं आमच्याकडे तयार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं वक्तव्य करुन काँग्रेसनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
आमच्याकडे सगळ्या इच्छुकांची नावं बंद पाकिटात आहेत, ती पाकिटं फोडलेली नाहीत, असं माणिकरावांनी म्हंटलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादीबरोबरच्या चर्चेत मतदारसंघांमध्ये फेरबदलही होऊ शकतो, असंही माणिकराव म्हणाले. याआधी राष्ट्रवादीने आम्हाला पूर्वीप्रमाणेच जागा हवी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं की आम्ही वरिष्ठांनी बोलतो. तर आमच्या जागा वाटपाचा विषय झाल्याचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटले होते. त्यानंतर जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडली. आता या ठिणगीत काँग्रेसने भर घातली आहे.
दरम्यान, निवडणुकपूर्व जनमत चाचण्यांवर बंदी घालण्यावरून राजकीय पक्षांमधील मतभिन्नता स्पष्ट झालीय. एकीकडे सत्ताधारी काँग्रेसने जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. तर भाजपनं मात्र या निर्णयाला विरोध केलाय. ज्यांना पराभवाची भीती वाटते, तेच अशा मागण्या करतात, अशा शब्दांत भाजपचे नेते अरूण जेटली यांनी काँग्रेसला चिमटा काढलाय. याबाबत आपलं मतं मांडण्याची राजकीय पक्षांना देण्यात आलेली मुदत संपली. यापूर्वी समाजवादी पार्टीनंही ओपिनियन पोलवर बंदी घालण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओपिनियन पोलवर बंदी घालण्याचं समर्थन केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.