स्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...

स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली. 

Updated: Apr 28, 2017, 04:00 PM IST
स्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...  title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली. 

'पॅरोलच्या नावावर फरार असलेल्या कुप्रसिद्ध गुंडाला पकडून आणा... नाहीतर कारवाईला सामोरे जा' अशा शब्दांत हायकोर्टानं मुंबई पोलिसांना गेल्या आठवड्यात खडसावलं होतं... आणि काय आश्चर्य... मुंबई पोलिसांनी खरंच त्या गुंडाला आठवड्याच्या आतच बेड्या ठोकल्या... त्याचं नाव शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे...

लखनभैय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा खास खबरी... पिंकी पांडेला पोलिसांनीच लपवून ठेवला होता का? असा सवाल आता लखनभय्याच्या नातेवाईकांकडून केला जातोय... 

वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्माचा खास असलेल्या पिंकी पांडेला लखनभैय्या हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. ती भोगत असताना पॅरोलवर बाहेर पडलेला पांडे तब्बल तीन वर्षं फरार होता. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तो नाव बदलून राहत होता. एकावेळी तो 10 मोबाईल नंबर वापरायचा. तो कुणाच्या संपर्कात होता, हे मोबाईल नंबर त्यानं गुन्ह्यासाठी वापरले होते का, असे सवाल आता केले जात आहेत.

गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखन भैयाचं नवी मुंबईतून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चकमकीचा बनाव रचला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त केएमएम प्रसन्ना यांच्या विशेष तपास पथकानं प्रदीप शर्मासह १४ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण २२ जणांना अटक केली. लखनभय्या अपहरणात पिंकी पांडेची मुख्य भुमिका होती. मात्र याप्रकरणी सत्र न्यायालयानं प्रदीप शर्माला निर्दोष सोडलं. तर उर्वरित सर्वांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती.

पांडेनं वैद्यकीय कारण पुढं करत नोव्हेंबर २०१३ मध्ये पॅरोल मिळवला. फेब्रुवारी २०१४ मध्ये त्याला पुन्हा कारागृहात परतणं बंधनकारक होतं. मात्र कारागृहात परतण्याऐवजी पांडे पसार झाला. दोन आठवड्यांनी कारागृह प्रशासनानं दिलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी पांडेविरोधात गुन्हा नोंदवला होता. मुंबई पोलिसांच्या मदतीमुळंच तो एवढा काळ फरार राहू शकला, असा संशय व्यक्त होतोय.