www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भ्रष्टाचारांच्या आरोपांप्रकरणी बिनशर्थ माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळ यांनी रितसर नोटीस बजावली आहे.
छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. 21 फेब्रुवारीला सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक घोटाळे असल्याचे आरोप केले होते. तसंच दिल्लीतलं महाराष्ट्र सदन आणि मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता.
हे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत भुजबळांनी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याबाबत नोटीस बजावलीये. नोटीस मिळाल्यापासून 48 तासांत सोमय्यांनी बिनशर्त माफी मागावी, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असं या नोटिशीमध्ये बजावण्यात आलंय.
माझ्यावर केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत. अन्यथा सोमय्या यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येतील, असा पुनरूच्चार भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्या काय उत्तर देतात किंवा केलेल आरोप मागे घेतात का, याकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.