महागड्या आभुषणांनी सजतायत गणपती बाप्पा!

गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे गणेश मंडळांची तयारी वेगाने सुरू आहे. बाप्पासाठी दागिन्यांचे सध्या विविध ट्रेंड बाजारात  पाहायला मिळत आहेत.  

Updated: Sep 11, 2015, 08:28 PM IST
महागड्या आभुषणांनी सजतायत गणपती बाप्पा! title=

मुंबई : गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे गणेश मंडळांची तयारी वेगाने सुरू आहे. बाप्पासाठी दागिन्यांचे सध्या विविध ट्रेंड बाजारात  पाहायला मिळत आहेत.  

गणरायाच्या विविध देखण्या मूर्ती ही गणेशोत्सवातली शान... मूर्तींना सजवण्यासाठी मंडळं विविध आभूषणांचा आधार घेतात. खास बाप्पासाठी सुंदर दागिने बाजारात उपलब्ध आहेत. 

गिरगाव इथे राहणारे नाना वेदक गेल्या २३ वर्षांपासून बाप्पासाठी विविध दागिने तयार करतात. सोन्याच्या दागिन्यांची मागणी गेल्या काही वर्षात वाढल्याचं ते सांगतात. सोन्याचा मुकूट, कंठी, सोनपट्टे, कान, आशिर्वादाचे हात, सोन पावलं, बाजूबंद, कडे हे सर्वकाही नाना वेदक तयार करतात. चांदीवर सोन्याचं प्लेटींग केलेल्या तसंच त्यावर हि-याची सजावट असलेल्या दागिन्यांची मागणीही वाढलीय.  

बाप्पाच्या सजावटीत कोणतीही कसर राहू नये याची काळजी मंडळं घेत असतात. अगदी पाच हजारांपासून ते ५ लाखांपर्यंतचे दागिने उपलब्ध आहेत. 
- गणेशाचा मोठा मुकूट साडेतीन किलोपर्यंत उपलब्ध असून त्याची किंमत २ लाखांपर्यंत आहे.
- २ किलोंची कंठी दीड लाखांपर्यंत आहे
- ६०० ग्रॅमचे बाजू बंद ६० हजार रूपयांपर्यंत आहेत
- सोन्याचे कान, सोन्याचे पाय साधारणतः ३० ते ४० हजारांच्या घरात आहे
 
दागिन्यांनी सजलेल्या बाप्पाचं रूप पाहायला सर्वच भक्त आतूर झालेत. मंडळांची तयारी जवळपास पूर्ण झालीय. अनेक ठिकाणी बाप्पा आधीपासूनच मंडपात विराजमानही झालेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.