मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक दिनाचं भाषण विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती नाही, असं राज्य शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलंय. तशा स्वरुपाची माहिती मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी राज्यांना दिलीय. पण काही दिवसांपूर्वी मोदींचं भाषण शाळांमध्ये दाखवणं बंधनकारक असल्याचा फतवा निघाल्यानं शाळांमध्ये धावपळ सुरू होती. अनेक ठिकांणी मोदींच्या भाषणाच्या सक्तीला विरोध होत होता.
मुंबईतल्या शाळांमध्ये मोदींचं भाषण दाखवण्याची तयारी करण्यात येतेय. नागपूरमध्ये अनेक शाळांमध्ये टीव्ही नसल्यानं नगरसेवकांच्या घरी शाळा भरवण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. तर नाशिकमध्ये मुख्याध्यापिकांच्या घरचा टीव्ही आणण्याचा विचार सुरू आहे. किंवा शाळेच्या शेजारच्या बिल्डिंगमधून केबल घेऊन भाषण दाखवण्याचा विचार आहे. तर पुण्यामध्ये मोदींचं भाषण दाखवण्यासाठी उदासीनता दिसतेय. जमलं तर बघू, असा प्रकार पुण्यात दिसतोय.
कोकणात तर वेगळाच घोळ झालाय. शाळांना गणपतीची सुट्टी असल्यानं विद्यार्थ्यांना बोलवायचं कसं आणि त्यांना भाषण दाखवायचं कसं, असा प्रश्न पडलाय. आज शिक्षक दिनानिमित्त होणारं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यासाठी औरंगाबादेतील शाळांनी जय्यत तयारी सुरु केलीये.. सरस्वती भुवन या शाळेत प्रोजेक्टरची सोय करण्यात आलीये. वीजेनं दगा दिल्यास जनरेटरशी सुद्धा सोय करण्यात आलीये.. विशेष म्हणजे या कार्यक्रमात काही त्रूटी राहू नये म्हणून त्याची रंगीत तालीमसुद्धा करण्यात आली.
एक दिवस आधीच शाळेतील विद्यार्थ्यांना हॉलमध्ये बसवून प्रोजेक्टरद्वारे माहितीपट दाखण्यात आली.. चिमुकले सुद्धा पंतप्रधांनांचा संवाद ऐकण्यासाठी आतुर असल्याचं चित्र या शाळेत पहायला मिळाले. त्याचबरोबर कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून खास तंत्रज्ञाची सुद्धा नियुक्ती करण्यात आलीये. पंतप्रधान मुलांसोबत संवाद साधणार याचे स्वागतच शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.