मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतले काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. दहा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हायकमांडला पत्र लिहीलं होतं, पण पत्राला उत्तर न मिळाल्यानं आपण काँग्रेस सोडत असल्याचं गुरुदास कामत यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आपण राजकीय संन्यास घेत असल्याचंही गुरुदास कामत यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्यातच गुरुदास कामत यांनी नाराज होऊन राजीनामा दिला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांना मानणारा एक गट आहे, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला याचा मोठा फटका बसू शकतो.
याआधी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनीही काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त केली होती. छत्तीसगडमध्ये जोगी नवा पक्ष काढण्याचीही चर्चा सुरु आहे. काँग्रेसमधल्या दिग्गजांच्या या नाराजी नाट्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.