मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा दावा गिरीश महाजन यांनी दावा केलाय. पण हा दावा फोल असल्याचं थोड्याच वेळात समोर आलंय.
'मार्ड'सोबत बैठक पार पडल्यानंतर गिरीश महाजन यांनी हा दावा केलाय. पुढल्या 15 दिवसांत 1100 सुरक्षारक्षत तैनात करण्यात येतील तसंच डॉक्टरांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्यात, असं महाजन यांनी म्हटलंय. त्यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टर आजपासून कामावर रुजू होणार असल्याचा दावाही महाजनांनी केला.
मात्र, मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा सरकारचा दावा आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशननं फेटाळून लावलाय. मार्डशी आपलं बोलणं झालं असून त्यांनी संप मागे घेतला नसल्याचं आयएमएचे अध्यक्ष अशोक तांबे यांनी 'झी 24 तास'ला सांगितलंय.
डॉक्टरांनी संप मागे घेतल्याच्या दाव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)चे अध्यक्ष अशोक तांबे यांनी साफ इन्कार केलाय. गेल्या तीन दिवसांपासून हा संप सुरू आहे... तो अजूनही सुरू असल्याचं तांबे यांनी म्हटलंय. संप काळात ओपीडी बंद राहील मात्र इमर्जन्सी सर्व्हिस आणि आयसीयू चालू असेल, असाही दावा तांबे यांनी केलाय. शासनानं आमच्या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष केलंय, त्यामुळे आमचा नाईलाज झाल्याचं तांबे यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे, मार्डच्या आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय़ घेतलाय. त्यामुळं आजपासून राज्यातले तब्बल 40 हजार डॉक्टर संपावर जाणार आहेत. त्यामुळं खासगी रुग्णालयांतील रुग्णांनाही फटका बसणार आहे. तसंच रेडिऑलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट संघटनेनंही या संपाला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळं राज्यातील वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची शक्यता असून रूग्णांचे अधिकच हाल होणार असल्याचं दिसंतय.