`असमर्थ ठरलेल्या विरोधी पक्षांची ही गरज...`

विरोधी पक्षांची म्हणून एक जागा असते आणि शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा घालवलेली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया लोकसत्ता या वर्तमानपत्राचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी दिलीय

Updated: Mar 8, 2013, 10:06 AM IST

www.24taas.com, मुंबई
विरोधी पक्षांची म्हणून एक जागा असते आणि शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा घालवलेली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया लोकसत्ता या वर्तमानपत्राचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी दिलीय. सोबतच महायुतीत मनसे सामील होण्याची शक्यता अधोरेखित करत ही बातमी योग्य असल्याचंही कुबेर यांनी म्हटलंय.

‘या क्षणाला विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सपशेल असमर्थ ठरले आहेत. पवारांच्याच शब्दात सांगायचं झालं तर हे दोन्ही पक्ष तोडबाजी करण्यात मग्न आहेत... ज्यांनी ज्यांनी ही बातमी नाकारली असेल ते त्यातले शिवसेनेचे नेते किती जण शरद पवारांच्या दाराशी पडलेले असतात, हे मी सांगायची गरज नाही...’ असं म्हणत गिरीश कुबेर यांनी बातमी नाकारणाऱ्या शिवसेनेला चांगलाच टोला हाणलाय.
‘मुद्दा बातमी खरी की खोटी हा मुद्दा नाही... काँग्रेस-राष्ट्रवादीला हरवायचं असेल तर या तीन पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव तिन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी झालीय आणि त्यांनी ती मान्यही केलीय’ असं म्हणत गिरीश कुबेर यांनी महायुतीत मनसे सामील होण्याची बातमी सत्य असल्याचं म्हटलंय.

या आघाडीचा पहिला टप्पा म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहा जागा शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यात समप्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय अंतिम टप्यात आल्याची माहिती लोकसत्ता या वर्तमानपत्रानं दिली होती.