मुंबई : दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये जोरदार खडाजंगी होत, गोंधळ होत अखेर विधानपरिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं.
विधानपरीषदेचं कामकाज आज १२ वाजता सुरु झालं. अविश्वासदर्शक ठरावाचा मुद्दा असल्याने सभापतींऐवजी उपसभापती वसंत डावखरे सभागृहाला सामोरे गेले. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट या विषयावर स्थगन प्रस्तावाची मागणी केली. मात्र हा विषय कामकाजात येणार असल्याने त्याची आत्ता गरज नसल्याचा दावा परिषदेचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. मात्र यावर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी लावून धरली.
यावर गोंधळ होत तीन वेळा परिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. त्यानंतर उपसभापती डावखरे यांनी उद्या चर्चा होईल असं स्पष्ट केलं. मात्र त्यावरही विरोधकांचे समाधान न झाल्याने घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.